प्रभाग २३ मध्ये पवना नदीची ‘गटारगंगा’ आणि मालकी हक्काचा तिढा; कधी सुटणार थेरगावचा प्रश्न?

पिंपरी-चिंचवडमधील एक महत्त्वाचे गावठाण म्हणून ओळखला जाणारा प्रभाग २३ सध्या विकासाच्या नव्या वळणावर उभा आहे. उच्चभ्रू सोसायट्या आणि दाट लोकवस्तीचा हा संमिश्र प्रभाग असला, तरी येथील नागरिकांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत.

१] ग्राउंड रिअॅलिटी:

‘पाणी’ आणि ‘नदी’ या दोन प्रमुख आघाड्यांवर संताप!

‘पॉलिटिकल वझीर’च्या पाहणीनुसार, प्रभागात काही गंभीर नागरी समस्या मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत:

पवना नदीचे प्रदूषण: थेरगाव गावठाण परिसरातून वाहणाऱ्या पवना नदीत थेट मैलामिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे नदीची अवस्था ‘गटारगंगे’सारखी झाली असून, परिसरात डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

मालकी हक्कपत्रांचा तिढा: सुमारे ५ हजारहून अधिक मिळकतींना प्राधिकरणाच्या मालकी हक्कपत्रांचे  वाटप अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यामुळे घरांची विक्री करणे किंवा नवीन बांधकाम परवानगी मिळवण्यात रहिवाशांना मोठ्या अडचणी येत आहेत.

घसा कोरडाच: थेरगाव आणि दत्त नगर परिसरात पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो. "रोज पाणी मिळावे" ही येथील नागरिकांची साधी पण महत्त्वाची मागणी आहे.

बसेसची कमतरता: वाढती लोकसंख्या पाहता पीएमपीएल बसेसची संख्या अत्यंत कमी असून, नागरिकांना प्रवासासाठी ताटकळत उभे राहावे लागते.

२] प्रभाग २३: सविस्तरचे विश्लेषणचे :-

बलस्थाने:- पायाभूत सुविधा: थेरगाव-चिंचवड जोडणारा बटरफ्लाय पूल आणि अंतर्गत सिमेंट रस्त्यांचे जाळे.

विकासकामे
: थेरगाव स्मशानभूमीत गॅसदाहिनी आणि बापूजी उद्यानाचे सुशोभीकरण पूर्ण.

उणिवा:-अस्वच्छता: रस्त्यांवर आणि मोकळ्या मैदानात पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य

नियोजन शून्य आरोग्य: थेरगाव नवीन रुग्णालयात पुरेशी साधनसामग्री आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव.

संधी:- नदी पुनरुज्जीवन: पवना नदी स्वच्छ करून तिथे पर्यटन केंद्र किंवा रिव्हरफ्रंट विकसित करण्याची मोठी संधी आहे.

मिळकत प्रश्न: जर मालकी हक्कपत्रांचा प्रश्न सुटला, तर तो कोणत्याही पक्षासाठी गेम चेंजर ठरेल.

धोके:- दफनभूमीचा प्रश्न: मुस्लिम समाजासाठी हक्काच्या दफनभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नाराजी आहे.

अतिक्रमणे: पदपथांवरील व्यावसायिक अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका.

३] मतदारांची आकडेवारी :-

एकूण मतदार: ३३,०३३

पुरुष: १७,६५७ | महिला: १५,३७३

आरक्षण: ३२ 'अ' (अ.जा. महिला), ३२ 'ब' (ओबीसी), ३२ 'क' (खुला महिला), ३२ 'ड' (खुला गट)

४] जनतेचा आवाज:-

  • राजश्री शिरवळकर (रहिवासी):- मिळकत पत्राचा प्रश्न मार्गी लावून अंतर्गत ड्रेनेज लाईन सुधारायला हव्यात.
  • गणेश जगताप (रहिवासी):- नदीत मिसळणारे सांडपाणी तातडीने थांबवा, दुर्गंधीमुळे जगणे कठीण झाले आहे.
  • नानासाहेब गवळी (रहिवासी):- पाणी रोज आणि वेळेवर मिळणे ही आमची माफक अपेक्षा आहे.

पॉलिटिकल वझीर’चा निष्कर्ष:-

प्रभाग २३ मधील मतदार यावेळी केवळ रस्त्यांच्या चकचकाटावर भुलणार नाहीत. येथील राजकारण आता ‘गावकी-भावकी’ पलीकडे जाऊन मालकी हक्क आणि पर्यावरण (नदी स्वच्छता) या दोन मुद्द्यांवर स्थिरावले आहे. थेरगावचा खरा नेता तोच ठरेल जो पवना नदीला गटारगंगेतून मुक्त करण्याचे धाडस दाखवेल आणि हजारो कुटुंबांच्या घरांवर त्यांच्या मालकीचा शिक्का (हक्कपत्र) मिळवून देईल.