पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समावेश होऊन बराच काळ लोटला तरी, प्रभाग २२ मधील अनेक भाग आजही विकास प्रक्रियेपासून लांब राहिले आहेत. विशेषतः काळेवाडी आणि लगतच्या परिसरात आरक्षित जागांचा विकास रखडल्यामुळे खेळाची मैदाने, भाजी मंडई आणि रुग्णालयांसारख्या अत्यावश्यक सोयींसाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
१. पॉलिटिकल वझीरच्या मते मतदारांची आकडेवारी:-
एकूण मतदार: ५२,६९९.
स्त्री-पुरुष प्रमाण: २७,७९३ पुरुष आणि २४,९०४ महिला मतदार.
प्रभागाचे आरक्षण: २२-अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), २२-ब (सर्वसाधारण महिला), २२-क (सर्वसाधारण) आणि २२-ड (सर्वसाधारण)
२. ‘बॅटल ग्राऊंड’ मधील प्रमुख भाग
या प्रभागात विजयनगर, नढेनगर, पवनानगर, ज्योतिबानगर, आदर्शनगर, कोकणे नगर आणि राजवाडे नगर या महत्त्वाच्या वस्त्यांचा समावेश होतो.
३. ग्राऊंड रिपोर्ट: “सुविधांची वानवा, नागरिकांचा वाढता रोष”
पॉलिटिकल वझीरच्या रिपोर्टनुसार, या प्रभागातील प्रमुख प्रश्न खालीलप्रमाणे आहेत
रखडलेली आरक्षणे: प्रभागात महापालिकेचे सुसज्ज रुग्णालय, शाळा आणि खेळाच्या मैदानासाठी जागा आरक्षित आहेत, मात्र अद्याप त्यांचा विकास झालेला नाही. काही ठिकाणी तर झालेली आरक्षणे रद्द झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.
अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी: काळेवाडी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. भाजी मंडईसाठी जागा नसल्याने विक्रेते रस्त्यावरच बसतात, ज्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो.
पाणी आणि ड्रेनेज समस्या: परिसरात अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. पावसाळी गटारांची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचते.
सुरक्षेचा प्रश्न: वाढती गुन्हेगारी रोखणे हे या भागातील मोठे आव्हान आहे. तसेच शाळांच्या परिसरात अनधिकृत टपऱ्यांमुळे विद्यार्थ्यांवर चुकीचे संस्कार होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
४. विकासाचा आढावा: प्रभाग २२
मार्गी लागलेली कामे
- आदर्शनगर येथे महापालिकेच्या मराठी शाळेची नवीन इमारत.
- तावडे नगर ते पवना नदीपर्यंत सांडपाणी वाहिनीचे काम पूर्ण.
- ज्योतिबा उद्यान आणि स्मशानभूमीचे नूतनीकरण.
रखडलेली कामे
- रहाटणी ते नदी किनारी बीआरटी रस्त्याला जोडणारा १८ मीटर रस्ता.
- ज्योतिबानगर येथील भाजी मंडई आणि क्रीडांगणाचा विकास.
- तापकीर मळा ते काळेवाडी मुख्य चौक दरम्यानचा १२ मीटर रुंद डीपी रस्ता.
५. विश्लेषण: प्रभाग २२
बळ:- मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित मतदारांची मोठी लोकसंख्या.
उणिवा:- सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि भाजी मंडईसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव.
संधी: – रखडलेले रस्ते आणि आरक्षित जागांचा ताबा मिळवून विकास केल्यास कोणत्याही नेत्याला मोठी संधी आहे.
धोका:- वाढती गुन्हेगारी आणि वाहतुकीचा गोंधळ यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.
पॉलिटिकल वझीरच्या सूचना:-
प्रभाग २२ मध्ये निवडणुकीचे वारे फिरवण्यासाठी केवळ रस्त्यांच्या गप्पा मारून चालणार नाही. जो उमेदवार काळेवाडीतील आरक्षित जागांचा विकास आणि वाहतूक कोंडीमुक्त काळेवाडी हे मुद्दे प्रकर्षाने मांडेल, त्यालाच जनता आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देईल.



