प्रभाग ८ (मध्य नागपूर): मुस्लिम मतदारांचा जोर, कोण ठरणार शिरजोर?

मध्य नागपूरचा प्रभाग ८ हा नागपूर महानगरपालिकेतील सर्वात हाय-प्रोफाईल आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रभाग मानला जातो. २०१७ मध्ये काँग्रेसने येथे ‘चौकार’ लगावला असला तरी, २०२६ च्या निवडणुकीत समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.

१. राजकीय पेच

काँग्रेसचा बालेकिल्ला की मतांचे विभाजन? या प्रभागात ५० हजारांहून अधिक मुस्लिम मतदार असून तेच विजयाची किल्ली ठरतात. काँग्रेसने आपल्या जुन्या नगरसेवकांच्या बळावर वर्चस्व टिकवण्याचा दावा केला आहे, मात्र भाजपने यावेळी मुस्लिम महिला उमेदवाराला रिंगणात उतरवून ‘कमळ’ फुलवण्याची रणनीती आखली आहे. यात एमआयएम फॅक्टर अत्यंत प्रभावी ठरणार आहे, कारण एमआयएमने यावेळी ४ उमेदवार देण्याचे संकेत दिले असून त्यामुळे होणारे मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडू शकते.

२. ग्राउंड रिअॅलिटी:

‘विकास’ की केवळ ‘घोषणा’?’पॉलिटिकल वझीर’च्या विश्लेषणानुसार, सिमेंट रस्त्यांच्या पलीकडे या प्रभागातील जनता मूलभूत सुविधांच्या अभावातून जात आहे.

आरोग्य व स्वच्छता: मोमीनपुरा सारख्या गजबजलेल्या बाजारपेठेत महिलांसाठी सार्वजनिक शौचालय नाही. ड्रेनेज व्यवस्था निकृष्ट दर्जाची असून पावसाळ्यात डोबी नगर आणि बोरीयापुऱ्यात पाणी शिरते

वाहतूक कोंडी: कडबी चौकातील पुलाचे काम अर्धवट असल्याने दररोजची वाहतूक कोंडी ही येथील नागरिकांची डोकेदुखी बनली आहे.

प्रलंबित प्रश्न: मोमीनपुरा येथील मुस्लिम कब्रस्तानाचे रुंदीकरण आणि अतिक्रमण हे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.

विश्लेषण: प्रभाग ८ (मध्य नागपूर)

(शक्ती): काँग्रेस: ५० हजार मुस्लिम मतदारांची एकगठ्ठा मते आणि प्रस्थापित नगरसेवकांचे नेटवर्क

(कमकुवतपणा): प्रशासकीय अपयश: कचरा व्यवस्थापन, निकृष्ट ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांची वानवा यामुळे मतदारांमध्ये नाराजी

(संधी): भाजप व एमआयएम: मतांच्या विभाजनामुळे भाजपला ‘किंगमेकर’ होण्याची संधी; तर तरुणांच्या आकर्षणाने एमआयएमला मोठी झेप घेता येईल.

(धोके): अँटी-इन्कम्बन्सी: जुन्या नगरसेवकांविरुद्धचा रोष आणि हलबा समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण हे मोठ्या पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे.

३. आखाड्यातील प्रमुख दावेदार

काँग्रेस: आशा नेहरू उईके, अँसारी सय्यद बेगम निजामुद्दीन, जीशान मुमताज मो. इरफान, जुल्फेकार अहमद भुट्टो, वसीम खान, सिराज अहमद, मुख्तार अन्सारी, फरीन कौसर, अब्दुल नियाजी, शमीम अख्तर, फजलुल कुरेशी, सईदा अन्सारी, निसार मुमताज, धीरज धकाते, उषा खरबीकर हे प्रस्थापित रिंगणात आहेत.

भाजप: श्रेयस विकास कुंभारे, कामिल अन्सारी, जयतुनबी अशफाक पटेल, राहुल खंगार, किशोर उमेरडकर, प्रभाकर निखारे, आसीफ गाजीयांची नावे चर्चेत आहेत.

एमआयएम: जावेद अख्तर, डॉ. सीमा रशमीन आणि मोहम्मद साजिद ताकदीने उतरणार आहेत.

‘पॉलिटिकल वझीर’चा निष्कर्ष:

प्रभाग ८ मध्ये केवळ पक्षाच्या नावावर मते मिळणार नाहीत. जो नेता ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली रखडलेले अंतर्गत रस्ते, ड्रेनेज आणि आरोग्याचे प्रश्न सोडवेल, त्यालाच इथला मतदार आपला ‘वझीर’ म्हणून स्वीकारेल.