नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग २० (तांडापेठ) हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि अटीतटीच्या लढतीसाठी ओळखला जातो. २०१७ मध्ये येथे तब्बल ४५ उमेदवार रिंगणात होते, ज्यामुळे मतांचे मोठे विभाजन झाले होते. यंदाही या प्रभागात अशीच परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
१. २०१७ चे निकाल आणि राजकीय समीकरणे
गेल्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेल्या ‘हाय-व्होल्टेज’ सामन्यात भाजपने ३ जागा जिंकून बाजी मारली होती, तर काँग्रेसला १ जागेवर समाधान मानावे लागले होते.
२०१७ चे विजयी नगरसेवक:
शकुंतला पारवे (भाजप), यशश्री नंदनवार (भाजप), रमेश पुणेकर (काँग्रेस) आणि दीपराज पार्डीकर (भाजप)
महत्त्वाचा फॅक्टर: माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी काँग्रेसच्या मोतीराम मोहाडीकर यांचा अवघ्या २६२ मतांनी पराभव केला होता.
२. प्रभागातील प्रमुख वस्त्या:-
या प्रभागात प्रामुख्याने हलबा समाजाची मोठी लोकसंख्या असून, विणकर आणि श्रमिक वस्त्यांचा यात समावेश होतो.
प्रमुख वस्त्या: तांडापेठ, ठक्करग्राम, विणकर कॉलनी, लेंडी तलाव, मस्कासाथ, लोहा ओळी, किराणा ओळी, मच्छीसाथ, जगनाथ बुधवारी, बंगाली पंजा, सावजी मोहल्ला, कुंभारपुरा, पिवळी मारबत, नाईक तलाव, नाईकवाडी, बांगलादेश वस्ती आणि खेरीपुरा
३. ग्राऊंड रिअॅलिटी: प्रलंबित प्रश्न आणि नाराजी
विकासाच्या दाव्यांच्या पलीकडे या प्रभागात अनेक मूलभूत समस्या अजूनही कायम आहेत.
- तलावांचे प्रश्न: नाईक तलावाचा विकास रखडला असून, लेंडी तलावात मोठ्या प्रमाणात पानकंद साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
- पायाभूत सुविधा: अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आणि जुन्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून मार्गी लागलेला नाही.
- वाहतूक कोंडी: गोलिबार चौक ते कमाल चौक दरम्यान नवीन उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते, ज्याचा फटका स्थानिक व्यापार्यांना बसत आहे.
४. इच्छुकांची यादी:-
भाजप: माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, राजेंद्र धकाते, हेमंत बरडे, भास्कर पराते, वामन पारवे, तुषार लारोकर, राजेश हातीबेड, प्रशांत दुर्गे, राजेश साळवे, स्वप्निल फुलसंगे, यशश्री नंदनवार, कल्पना मानापुरे, रेखा निमजे, किरण बांगडे, पुष्पा पाठरावे.
काँग्रेस: माजी नगरसेवक रमेश पुणेकर, हरी पराते, शंकर रणदिवे, मोतीराम मोहाडीकर, गंगाधर बांदेकर, वीरेंद्र चहांदे, आशा पुणेकर, अक्षय डोलकर, विपीन लोखंडे, सतीश समुद्रे, मुन्ना शिवाई ओमप्रकाश शाहीर, रवी पराते, किरण रणदिवे.
५. ‘राजकीय वझीर’चा स्ट्रॅटेजिक व्ह्यू:-
प्रभाग २० मध्ये विजय मिळवण्यासाठी ‘हलबा समाजाची व्होट बँक’ आणि ‘मतविभाजन टाळणे’ हे दोनच मंत्र यशस्वी ठरतील.
धोका: गेल्या वेळी अपक्ष उमेदवार आणि शिवसेनेने सात हजारांच्या आसपास मते घेतली होती. यंदाही अपक्ष किंवा तिसऱ्या आघाडीचे उमेदवार कोणाची मते खातात, यावर भाजप-काँग्रेसचे भवितव्य ठरेल.
संधी: ओबीसी आरक्षणातील संभाव्य बदलांमुळे काही नवीन इच्छुकांना संधी मिळू शकते, ज्यामुळे प्रस्थापित नेत्यांसमोर आव्हान उभे राहील.
निष्कर्ष:
प्रभाग २० मध्ये जो उमेदवार ‘लेंडी तलाव’ आणि ‘झोपडपट्टी पुनर्वसन’ या प्रश्नांवर ठोस तोडगा देईल, तोच मतदारांचा विश्वास संपादन करू शकेल.



