वाल्हेकरवाडीला विकासाचे केवळ ‘गाजर’; ३० वर्षांनंतरही अनधिकृत घरांचा मुद्दा तापलेलाच!

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत १९९७ साली समावेश होऊनही वाल्हेकरवाडी (प्रभाग १७) हा भाग भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या आजही दुर्लक्षित राहिला आहे. सामान्य कामगारांना राहण्यासाठी शहरात प्रथम प्राधान्य असलेला हा परिसर असूनही येथील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे.

१. पॉलिटिकल वझीरच्या मते मतदारांची आकडेवारी:-

एकूण मतदार: ५६,५२३

मतदार विभागणी: २९,७४९ पुरुष आणि २६,७५९ महिला मतदार.

प्रभागाचे आरक्षण: १७-अ (अनुसूचित जाती महिला), १७-ब (ओबीसी), १७-क (महिला) आणि १७-ड (सर्वसाधारण खुला गट).

२. ‘बॅटल ग्राऊंड’ मधील प्रमुख भाग:-

या प्रभागात वाल्हेकरवाडी गावठाण, चिंतामणी चौक (काही भाग), भोंडवे वस्ती, चिंचवडे नगर, बिजलीनगर, गिरीराज सोसायटी परिसर, प्रेमलोक पार्क आणि दळवी नगर या भागांचा समावेश होतो.

३. ग्राऊंड रिपोर्ट: प्रश्नांचा ‘पाऊस’ आणि आश्वासनांचा ‘पूर’:-

पॉलिटिकल वझीरच्या ग्राऊंड रिपोर्टनुसार येथील रहिवाशांच्या मुख्य समस्या खालीलप्रमाणे आहेत:

अनधिकृत घरांचा प्रश्न: नवनगर विकास प्राधिकरण बाधित अनधिकृत घरे अधिकृत करण्याचे आश्वासन केवळ निवडणुकांपुरतेच दिले जाते. नियम शिथिल करून ही घरे अधिकृत करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

पाणी आणि आरोग्याची हेळसांड: परिसरात अनेक ठिकाणी कमी दाबाने आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. तसेच आरोग्य उपकेंद्रात पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत.

वाहतूक कोंडी आणि भाजी मंडई: वाल्हेकरवाडी परिसरात भाजी मंडई नसल्याने विक्रेते रस्त्यावरच बसतात, ज्यामुळे सकाळ-संध्याकाळ मोठी वाहतूक कोंडी होते.

स्मशानभूमीचा अभाव: जवळपास ३० वर्षे होऊनही या भागात स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नाही, ज्यामुळे अंत्यविधीसाठी नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

रखडलेले पूल आणि रस्ते: बिजलीनगर स्पाइन रस्त्यावरील डेअरी फार्मला जोडणारा पूल अनेक वर्षांपासून ‘जैसे-थे’ आहे.

४. विकासाचा आढावा: प्रभाग १७:-

मार्गी लागलेली कामे:

  • चिंचवड जुना जकात नाका ते रावेत हद्दीपर्यंत अर्बन स्ट्रीट योजनेचे काम. .
  • गुरुद्वारा चौक परिसराला जोडणाऱ्या सबवेचे काम.
  • चिंचवड पोलीस स्थानकाचे अंकित चिंतामणी चौकातील पोलीस चौकी.

रखडलेली कामे:-

  • बिजलीनगर ते रावेत जोडणारा रेल्वे पूल आणि २४ मीटर डीपी रस्ता.
  • वाल्हेकरवाडी गावठाण आणि भोंडवे वस्तीतील रस्त्यांची समस्या.
  • ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, आरोग्य केंद्र आणि सांडपाणी निचरा व्यवस्था.

५. विश्लेषण: प्रभाग १७:-

बळ: मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गाची मोठी लोकसंख्या जी प्रभागाचा चेहरा बदलू शकते.

उणिवा: स्मशानभूमी, क्रीडांगण आणि उद्यानांचा अभाव; मूलभूत नागरी सुविधांची कमतरता.

संधी: अनधिकृत घरांचा प्रश्न मार्गी लावणारा आणि पवना नदी सुधार प्रकल्पांतर्गत प्रदूषण थांबवणारा नेता मतदारांचा विश्वास जिंकेल.

धोका: नदीकाठच्या घरांना असलेला पुराचा धोका आणि वाढत्या डबक्यांमुळे होणारे आरोग्याचे नुकसान.

पॉलिटिकल वझीरचे संकेत:-

प्रभाग १७ मध्ये निवडणुका जिंकायच्या असतील, तर केवळ रस्त्यांचे डांबरीकरण करून चालणार नाही. जो उमेदवार अनधिकृत घरांच्या टांगत्या तलवारीतून नागरिकांना मुक्त करेल आणि वाल्हेकरवाडीला हक्काची स्मशानभूमी व उद्यान मिळवून देईल, तोच खरा वझीर ठरेल.