पिंपरी-चिंचवडमधील सर्वात सुबक आणि सुनियोजित मानला जाणारा ‘प्राधिकरण’ परिसर प्रभाग १५ मध्ये येतो. मात्र, सद्यस्थितीत इथली चकचकीत प्रतिमा केवळ नावापुरतीच उरली आहे का? असा प्रश्न येथील उच्चभ्रू नागरिकांना पडला आहे. ‘पॉलिटिकल वझीर’च्या ग्राऊंड रिपोर्टनुसार, अतिक्रमणे आणि रखडलेल्या प्रकल्पांमुळे हा प्रभाग सध्या राजकीयदृष्ट्या चांगलाच तापला आहे.
१. ‘प्राधिकरणा’ची ओळख आणि सद्यस्थिती:-
१९७२ मध्ये स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (PCNTDA) हा मुख्य भाग आहे. येथे प्रामुख्याने गंगासागर, सिंधूनगर आणि आकुर्डी रेल्वे स्थानक परिसराचा समावेश होतो. मात्र, गेल्या काही काळापासून अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि वाढती अतिक्रमणे यामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला आहे.
२. ज्वलंत नागरी समस्या:-
उच्चभ्रू भाग असूनही नागरिकांना खालील मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे:
अतिक्रमणे आणि पार्किंग: पदपथांवर झालेली अतिक्रमणे आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना होणारी बेशिस्त पार्किंग यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे
पाणी आणि स्वच्छता: आकुर्डी गावठाण परिसरात पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने आणि अनियियमितपणे होत आहे. तसेच घंटागाड्या वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी गृहिणी करत आहेत.
उद्यानांची दुरवस्था: सुप्रसिद्ध ‘दुर्गा देवी उद्याना’ची देखभाल नीट होत नाही, तेथे मद्यपींचा वावर वाढला असून दुर्गंधी पसरली आहे.
३. प्रभाग १५ चे विश्लेषण:-
बलस्थाने :- सुसंस्कृत मतदार: सुशिक्षित आणि जागरूक मतदारांमुळे विकासाच्या मुद्द्यावर येथे मतदान होते.
नियोजित पायाभूत सुविधा: ग. दि. माडगुळकर नाट्यगृहासारखी दर्जेदार कामे मार्गी लागली आहेत.
उणिवा:- रखरखीत रस्ते: अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण अनेक ठिकाणी रखडलेले आहे.
अपुरी सुरक्षा: उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक नसल्याने असामाजिक तत्वांचा वावर वाढला आहे.
संधी:- हरित नियोजन: जर हरित सेतू सारखे प्रकल्प यशस्वी झाले, तर प्रभागाचा दर्जा उंचावेल.
सार्वजनिक स्वच्छतागृहे: आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात सुसज्ज स्वच्छतागृहे उभारल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
धोके:- आरोग्याचा प्रश्न: सार्वजनिक स्वच्छतेच्या अभावामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका कायम आहे.
पावसाळी पाण्याचा निचरा: सीमा हाऊसिंग सोसायटीसारख्या भागात पावसाळी पाण्याचा निचरा होत नसल्याने घरात पाणी शिरते.
४. प्रभागातील समीकरणे आणि लोकसंख्या:-
या प्रभागात आकुर्डी गावठाण, गंगानगर, वाहतूकनगरी, सेक्टर २४ ते २८, सिंधूनगर, परमार पार्क,स्वप्नपूर्ती सोसायटी, आणि रेल्वे स्टेशन परिसर यांचा समावेश होतो.
एकूण मतदारसंख्या: ४७,८९८
पुरुष मतदार: २४,८१६ | स्त्री मतदार: २३,०७९
आरक्षण: अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण (खुला)
५. स्थानिक नागरिकांचा संताप:-
- उद्यानांची अवस्था दयनीय आहे, प्रशासनाचे याकडे अजिबात लक्ष नाही.
- पाणीपुरवठा अनियमित आहे आणि पावसाळ्यात घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान होते.
- रस्त्यांवर वाहने उभी केल्याने चालणे कठीण झाले आहे, पदपथ मोकळे व्हायला हवेत.
निष्कर्ष:
प्रभाग १५ मधील नागरिक आता केवळ नियोजित शहर या नावावर समाधानी नाहीत. जो उमेदवार अतिक्रमण मुक्ती आणि नियमित पाणीपुरवठा याचे आश्वासन देऊन प्रत्यक्ष कृती करेल, तोच या प्रभागाचा खरा मंत्री होईल.



