पिंपळे गुरवमध्ये आरक्षित जागा धूळखात; पार्किंगच्या प्रश्नाने नागरिक हैराण!

पवना नदीच्या काठी वसलेले आणि गेल्या काही दशकांत झपाट्याने नागरीकरण झालेले प्रभाग क्रमांक ३१ (पिंपळे गुरव – नवी सांगवी) सध्या विकासाच्या कागदी घोड्यांत अडकले आहे. रोजगार आणि शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरून येऊन स्थायिक झालेल्यांची संख्या मोठी असली, तरी मूलभूत सुविधांच्या बाबतीत हा प्रभाग आजही संघर्षाच्या उंबरठ्यावर आहे.

१} ग्राउंड रिअॅलिटी: ‘कागदावर ओके, प्रत्यक्षात मात्र अपूर्ण!’

‘पॉलिटिकल वझीर’च्या ग्राऊंड रिपोर्टनुसार, या प्रभागात प्रशासकीय अनास्था स्पष्टपणे दिसून येते:

रस्त्यांची दुरवस्था: कृष्णा चौक ते एम. के. चौक या मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. सध्या रस्त्यावर केवळ डांबराचे ठिगळ लावून वेळ मारून नेली जात आहे, ज्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय.

पार्किंगची डोकेदुखी: राजीव गांधीनगर, कृष्णा चौक, एम. एस. काटे चौक आणि काटेपूरम चौक अशा प्रमुख ठिकाणी पार्किंगची गंभीर समस्या आहे. गल्लीबोळातील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेली आहे.

पाणी आणि स्वच्छता: नवी सांगवी परिसरात पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होतो. झोपडपट्टी बहुल भागात ड्रेनेज लाईनची नियमित साफसफाई होत नसल्याने सांडपाणी साचून दुर्गंधी पसरत आहे.

२} प्रभाग ३१: सविस्तर विश्लेषण:-

बलस्थाने:– शिक्षण आणि सोयी: प्रभागात अनेक नामांकित खासगी शाळा आहेत. महत्त्वाची कनेक्टिव्हिटी: सांगवी फाटा उड्डाणपूल आणि पवना नदीकाठचा परिसर यामुळे प्रवासाची सोय.

संधी:- सुसज्ज व्यायामशाळा: आधुनिक बंदिस्त व्यायामशाळा उभारून तरुणाईला आकर्षित करण्याची संधी.

स्पर्धा परीक्षा केंद्र: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सोय करणे आवश्यक.

धोके:- पाणी बिल गोंधळ: पाणी मीटर दुरुस्ती वेळेवर होत नाही, मात्र बिल वेळेवर येते, ज्यामुळे रहिवाशांमध्ये रोष आहे.

भटकी जनावरे: परिसरात मोकाट कुत्री आणि जनावरांचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत आहेत.

३} मतदारांची आकडेवारी :-

एकूण मतदार: ४८,६२०
पुरुष मतदार: २५,०७३ | महिला मतदार: २३,५४५
आरक्षण: ३१ ‘अ’ (अ.जा. महिला), ३१ ‘ब’ (ओबीसी), ३१ ‘क’ (सर्वसाधारण महिला), ३१ ‘ड’ (सर्वसाधारण खुला)

४} जनतेचा आवाज: पॉलिटिकल वझीरशी संवाद :-

किशन फसके (पिंपळे गुरव): उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत झाली, पण मैदान आणि उद्याने विकसित न झाल्याने विकास अपूर्ण वाटतो.

राधिका दीक्षित (नवी सांगवी): पाणीपुरवठा अनियमित आहे, कचरागाड्या वेळेवर येत नाहीत, प्रशासनाचे याकडे अजिबात लक्ष नाही.

प्रशांत रिकाने (नवी सांगवी): दिवसाआड पाणी येते, त्यामुळे कामगार आणि गृहिणींना मोठी कसरत करावी लागते.

पॉलिटिकल वझीरच्या सूचना:-

प्रभाग ३१ मधील निवडणूक यावेळी केवळ ‘जाती-पाती’च्या गणितावर नाही, तर रखडलेल्या विकासकामांच्या जाब विचारण्यावर असेल. येथील सुशिक्षित मतदारांना आता कागदोपत्री ‘ओके’ असलेला विकास नको, तर जमिनीवर दिसणारा बदल हवा आहे, पिंपळे गुरव आणि सांगवीचा खरा नेता तोच ठरेल जो ‘आरक्षित जागांवरील उद्याने’ विकसित करेल आणि ‘पार्किंगच्या चक्रव्यूहातून’ रहिवाशांची मुक्तता करेल. यंदा ‘बंद ड्रेनेज’ आणि ‘वेळेवर येणाऱ्या पाणी बिलांपेक्षा वेळेवर येणाऱ्या पाण्याची’ मागणी निवडणुकीचा निकाल ठरवेल!