पिंपरीची ‘आर्थिक वाहिनी’ समस्यांच्या कोंडीत; प्रभाग १९ मध्ये विकासाचा समतोल हरवला?

पिंपरी-चिंचवड शहराच्या सामाजिक आणि आर्थिक नकाशावर केंद्रस्थानी असलेला प्रभाग १९ सध्या अनेक आव्हानांचा सामना करत आहे. पिंपरी आणि चिंचवडला जोडणाऱ्या लिंक रोडवरील हा भाग कामगार वस्त्या, जुनी बाजारपेठ आणि उच्चभ्रू सोसायट्यांचा एक अनोखा संगम आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेले प्रश्न आता निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर आले आहेत.

१. पॉलिटिकल वझीर ग्राऊंड रिपोर्ट: ज्वलंत समस्या:-

प्रभागाचा विस्तार मोठा असला, तरी काही भागांत विकासाची गती समाधानकारक नाही:

पुनर्वसन आणि आरक्षण: भाटनगर आणि चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन, तसेच उद्यानांसाठी राखलेली आरक्षणे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.

वाहतूक कोंडी आणि वाहनतळ: शहराची मुख्य बाजारपेठ असूनही या भागात सुसज्ज वाहनतळ नाही. पिंपरी कॅम्प आणि मुख्य चौकात होणारी वाहतूक कोंडी व्यापाऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

स्वच्छतागृहांचा अभाव: खरेदीसाठी येणाऱ्या महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोठी कमतरता आहे.

पाणीपुरवठा: सोसायट्यांमध्ये पाण्याची समस्या गंभीर असून, दिवसाआड आणि कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.

२. मार्गी लागलेली कामे :-

काही आघाड्यांवर प्रशासनाला यश आले आहे:

पायाभूत सुविधा: फुल मार्केट, चिंचवडमधील उद्याने आणि एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाला जोडणारे रस्ते पूर्ण झाले आहेत.


गृहप्रकल्प: भाटनगर येथे जेएनएनयूआरएम च्या माध्यमातून घरकुल योजना राबवण्यात आली आहे.

३. प्रभाग १९ विश्लेषण:-

संधी:- बाजारपेठेचे आधुनिकीकरण: पिंपरी कॅम्पमधील भाजी मंडईचे योग्य नियोजन केल्यास आणि वाहनतळ उभारल्यास स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळेल. .
विरंगुळा केंद्र: ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि उद्याने विकसित करण्याची मोठी संधी येथे आहे.

धोके:-नागरिकांचा संताप: मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या भागातील मतदार यावेळी ‘परिवर्तनाचा’ पवित्रा घेऊ शकतात.
सुरक्षेचा प्रश्न: अरुंद रस्ते आणि बेशिस्त पार्किंगमुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

४. प्रभागातील समीकरणे आणि लोकसंख्या:-

या प्रभागात विजयनगर, उद्योगनगर, सुदर्शननगर, श्रीधरनगर, आनंदनगर, भोईर कॉलनी, गावडे पार्क, भीम नगर, सम्राट अशोकनगर, भाटनगर, भाजी मंडई आणि पिंपरी कॅम्प यांचा समावेश होतो.

एकूण मतदारसंख्या: ५६,३०७.

पुरुष मतदार: २९,०५७ | स्त्री मतदार: २७,२४७.

आरक्षण: ३२ अ- अनुसूचित जाती महिला, ३२ ब- ओबीसी, ३२ क- खुला गट महिला, ३२ ड- खुला गट.

५. जनतेचा कौल: काय म्हणतात रहिवासी?

  • घनश्याम चौधरी (व्यापारी): बाजारपेठ असूनही वाहनतळ नाही, वाहतूक कोंडीमुळे मुलांना बाहेर पाठवायला भीती वाटते.
  • श्रेया पडगिलवार (रहिवासी): महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत, उद्यानांसाठी आम्हाला लांब जावे लागते.
  • समाधान गायकवाड (नागरिक): काही भागाचा कायापालट झाला, पण काही भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.
  • आनंद शुक्ला (गावडे पार्क): सोसायट्यांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, वारंवार विनंती करूनही दखल घेतली जात नाही.

निष्कर्ष:

प्रभाग १९ मधील जनता आता केवळ बाजारपेठेचे केंद्र या ओळखीवर समाधानी नाही. जो उमेदवार पार्किंगची समस्या, पाणीपुरवठा आणि झोपडपट्टी पुनर्वसन या त्रिसूत्रीवर काम करेल, तोच यावेळेस विजयाचा खरा मानकरी ठरेल.