पिंपरी-चिंचवडचे प्रवेशद्वार मानले जाणारे निगडी गावठाण आणि यमुनानगर परिसर प्रभाग १३ मध्ये येतात. या प्रभागात एका बाजूला विकासाची चकचकीत चक्रे फिरताना दिसत असली, तर दुसरीकडे झोपडपट्टीवासीय आणि मनपा कॉलनीतील नागरिक मूलभूत हक्कांसाठी आजही लढा देत आहेत.
१. प्रभागातील प्रलंबित प्रश्न:-
झगमगाटाच्या आड दडलेल्या काही गंभीर समस्या मतदारांमध्ये संताप निर्माण करत आहेत:
पाणी आणि आरोग्याचा प्रश्न: यमुनानगर येथील ‘मीनाताई ठाकरे जलतरण तलाव’ दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आणि दूषित पाण्याचे प्रमाणही वाढले आहे.
मनपा कॉलनीची दुरवस्था: सेक्टर २२ मधील पीसीएमसी कॉलनीतील ९ इमारतींची अवस्था अत्यंत धोकादायक आणि जीर्ण झाली आहे. येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून धूळ खात पडला आहे.
२. विकासाची बलस्थाने:-
काही कामांनी या प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत केली आहे:
पायाभूत सुविधा: निगडी प्राधिकरणाकडे जाणारा भुयारी मार्ग, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल आणि अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण ही कामे मार्गी लागली आहेत.
सुशोभीकरण: यमुनगरमधील ‘सद्गुरु दत्त उद्यान’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचा प्रवेशद्वार कमान ही कामे पूर्ण झाली आहेत.
३. प्रभाग १३ विश्लेषण:-
संधी:- पुनर्वसन प्रकल्प: जर एसआरए किंवा मनपाने सेक्टर २२ मधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवला, तर तो निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरेल.
आरोग्य सुविधा: यमुनानगर रुग्णालयाचे विस्तारीकरण झाल्यास गरीब रुग्णांना मोठा आधार मिळेल.
धोके:- वाहतूक कोंडी: अंकुश चौक आणि टिळक चौकातील रोजची वाहतूक कोंडी व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेत आहे.
स्वच्छतेचा अभाव: परिसरात वाढलेले अतिक्रमण आणि कचऱ्याची दुर्गंधी यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
४. प्रभागातील समीकरणे आणि लोकसंख्या:-
या प्रभागामध्ये निगडी गावठाण, सेक्टर २२, ओटा स्कीम, यमुनानगर, सािनाथनगर आणि श्रीकृष्ण मंदिर परिसर यांचा समावेश होतो.
एकूण मतदारसंख्या: ४८,५३२.
पुरुष मतदार: २५,२६० | स्त्री मतदार: २३,२६४.
आरक्षण: अ- अनुसूचित जाती, ब- मागास प्रवर्ग महिला, क- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण.
५. जनतेचा कौल :-
- झोपडपट्टीचे विस्तारीकरण होत आहे, पण कचरा आणि दुर्गंधीचा त्रास कमी झालेला नाही.
- दिवसातून दोन वेळा वीज पुरवठा खंडित होणे आणि पाणी गळती हे आमचे रोजचे प्रश्न आहेत.
- जलतरण तलाव तातडीने सुरू व्हायला हवा, कारण मुलांना खेळण्यासाठी जागा नाही.
निष्कर्ष:-
प्रभाग १३ मधील मतदार यावेळी केवळ रस्त्यांच्या कामावर खुश होणार नाहीत. ज्या उमेदवाराकडे ‘झोपडपट्टी पुनर्वसन’ आणि ‘आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण’ यासाठी ठोस आराखडा असेल, तोच यावेळेस विजयाचा ‘वझीर’ ठरेल.



