पिंपरी-चिंचवडमधील सर्वात वेगाने विकसित होणारा आणि हिंजवडी आयटी हबच्या कुशीत वसलेला प्रभाग क्रमांक २६ सध्या एका मोठ्या विरोधाभासाचा सामना करत आहे. आलिशान इमारती आणि आयटी प्रोफेशनल्सची वस्ती असलेल्या या प्रभागातून महापालिकेला सर्वाधिक कर मिळतो, मात्र मूलभूत सुविधांच्या बाबतीत येथील नागरिक आजही ‘दुय्यम’ वागणूक मिळत असल्याची भावना व्यक्त करत आहेत.
1] ग्राउंड रिअॅलिटी: ‘टँकर’च्या दावणीला बांधलेला विकास!
‘पॉलिटिकल वझीर’च्या ग्राऊंड रिपोर्टनुसार, या प्रभागातील काही प्रश्न इतके जुने झाले आहेत की ते आता येथील रहिवाशांच्या जगण्याचा भाग बनले आहेत:
पाणीबाणी: वाकड आणि पिंपळे निलखमधील अनेक सोसायट्यांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. “आम्ही महापालिकेला भरमसाठ कर भरतो, मग पिण्यासाठी पाणी विकत का घ्यावे?” असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत.
वाहतुकीचा चक्रव्यूह: मुंबई-बेंगळुरू महामार्गाला लागून असल्याने येथे रोजची वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेली आहे. पार्किंगसाठी नियोजित जागा नसल्याने रस्त्यांच्या दुतर्फा होणारी बेशिस्त पार्किंग ही मोठी समस्या आहे.
फेरीवाल्यांचा विळखा: वाकड चौकापासून ते अंतर्गत रस्त्यांपर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथ काबीज केले आहेत, ज्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे.
कचरा आणि दुर्गंधी: सोसायट्यांतून कचरा उचलण्याचे नियोजन कोलमडल्याने आणि कचरा डेपोच्या समस्येमुळे नागरिक हैराण आहेत.
2] प्रभाग २६: सविस्तर विश्लेषण:-
बलस्थाने :- आर्थिक केंद्र: महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा प्रभाग
शिक्षण आणि आयटी: नामांकित शाळा, महाविद्यालये आणि आयटी पार्कची जवळीक.
उणिवा:- पाणी टंचाई: उन्हाळ्यात टँकरमाफियांचे वर्चस्व आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा
सांस्कृतिक भवनाचा अभाव: महापालिकेचे एकही स्वतःचे सांस्कृतिक भवन या भागात नाही.
संधी:- स्मार्ट पार्किंग: पार्किंगच्या जागा विकसित करून वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणे शक्य
अर्बन स्ट्रीट मॉडेल: अंतर्गत रस्त्यांचे ‘अर्बन स्ट्रीट’मध्ये रूपांतर करून नागरिकांना फिरण्यासाठी चांगले पदपथ देणे.
धोके:- अनियोजित नागरीकरण: वाढत्या बांधकामांमुळे पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येऊन भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
आरोग्य आणि वीज: अनियमित वीजपुरवठा आणि कचऱ्यामुळे पसरणारे आजार हा मोठा धोका आहे.
3] मतदारांची आकडेवारी :-
एकूण मतदार: ६५,४८८
पुरुष: ३४,८१७ | महिला: ३०,६६६
आरक्षण: २६ ‘अ’ (अ.जा. राखीव), २६ ‘ब’ (ओबीसी महिला), २६ ‘क’ (सर्वसाधारण महिला), २६ ‘ड’ (सर्वसाधारण खुला)
4] जनतेचा आवाज:
- अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत आणि पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते, ही स्मार्ट सिटीची कोणती लक्षणे आहेत?
- पार्किंगचे नियोजन नाही, रस्त्यावर होणाऱ्या आठवडे बाजारामुळे प्रचंड त्रास होतो.
- अर्धवट रस्ते पूर्ण होणे गरजेचे आहे, बेशिस्त पार्किंगमुळे अपघात वाढले आहेत.
‘पॉलिटिकल वझीर’चा धारदार निष्कर्ष:
प्रभाग २६ मधील मतदार हा सुशिक्षित, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारा आणि स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक आहे. येथील जनता आता केवळ रस्ते आणि उड्डाणपुला’वर समाधानी नाही, या प्रभागाचा प्रतिनिधी तोच ठरेल जो वाकडमधील टँकर राज संपवून थेट नळाद्वारे पुरेसे पाणी देईल आणि वाहतूक कोंडी मुक्त थेरगाव-वाकड कनेक्टिव्हिटी देईल. यंदा प्रभाग २६ मध्ये ‘टॅक्स’च्या बदल्यात सर्विसेस मागणारा मतदार निवडणुकीचा निकाल ठरवेल.



