प्रभाग ३४: काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळाची एन्ट्री; पांडव-लोंढे जोडीसमोर सुभेदार निवडीचा पेच!

नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग ३४ हा दक्षिण नागपुरातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रभाग आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने या प्रभागावर आपली मजबूत पकड निर्माण केली असली, तरी यंदा काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांनी आणि बदललेल्या समीकरणांनी भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

१. पोल्टीकल वझीरचा चष्मा: नेत्यांचे अस्तित्व पणाला!

भाजपची तटबंदी: भाजपने या प्रभागात इच्छुकांची संख्या वाढवून आपली संघटनात्मक ताकद वाढवली आहे. मात्र, सुभेदार (उमेदवार) निवडताना पक्षाची मोठी ओढाताण होणार, हे स्पष्ट आहे.

काँग्रेसची रणनीती: काँग्रेसचे खंबीर नेते गिरीश पांडव आणि अतुल लोंढे यांनी दक्षिण नागपुरात स्वतःचे स्वतंत्र वलय निर्माण केले आहे. भाजपच्या बंडखोरांवर काँग्रेसचा डोळा असून, योग्य वेळी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची तयारी पक्षाने केली आहे.

समाज समीकरण: हा प्रभाग प्रामुख्याने ओबीसी बहुल असून, येथे अनुसूचित जाती (१३ हजार) आणि अनुसूचित जमाती (६ हजार) मतदारांची संख्या निर्णायक आहे.

२. ‘बॅटल ग्राऊंड’ मधील प्रमुख वस्त्या

मानेवाडा, विणकर कॉलनी, गजानननगर, ओंकारनगर, श्रीहरीनगर, शाहूनगर, जानकीनगर, जयभोलेनगर, बाबाभोलेनागर , शिवशक्तीनगर,महाकालीनगर, विज्ञाननगर, आकाश नगर, जयहिंद नगर, रामटेकनगर आणि राहटेनगर टोली.

३. निवडणुकीच्या आखाड्यातील इच्छुक :-

या प्रभागात दोन्ही बाजूंनी इच्छुकांची लांबलचक यादी आहे:

भाजप: मंगला खेकरे, नागेश मानकर, माधुरी ठाकरे, राजेंद्र सोनकुसरे, संजय ठाकरे, मनोज जाचक, विनोद कडू, सुनील मानेकर, प्रवीण ठाकरे, शशांक खेकरे, कपिल ढोबळे, आणि बंडू शिरसाठ.

काँग्रेस: कल्पना जोगे, प्रवीण सांदेकर, भोला कुचनकर, रामभाऊ कावडकर, शंकर थुल, विनोद नामदेवते, रामू गाडगे, आणि अलका इंगोले.

४. जनतेचा आवाज: विकासाच्या गप्पा, पण समस्यांचा डोंगर

सिमेंट रोड आणि झगमगाटाच्या घोषणा असल्या तरी जमिनीवर नागरिक त्रस्त आहेत:

चुकीचे सिमेंट रोड: सिमेंट रोडमुळे रस्त्याची उंची वाढली आणि घरे खाली गेली, परिणामी पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरते.

स्वच्छतेचा फज्जा: प्रभागात नियमित स्वच्छता होत नाही आणि ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

सुविधांचा अभाव: शाहूनगर भागात लहान मुलांसाठी गार्डन नाही, तर टोली परिसरात मनपा शाळा आणि वाचनालयाची दुरवस्था झाली आहे.

अतिक्रमणाचा विळखा: मानेवाडा चौक आणि ओेंकारनगर ते बेसा रोडवर अतिक्रमणामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते.

५. प्रभाग ३४ विश्लेषण:

(बळ):-भाजपची संघटनात्मक बांधणी आणि दक्षिण नागपुरातील वर्चस्व.

(उणिवा):- सिमेंट रोडच्या चुकीच्या नियोजनामुळे मतदारांमध्ये असलेला तीव्र संताप.

(संधी):- काँग्रेससाठी पांडव-लोंढे या जोडगोळीच्या नेतृत्वात पुन्हा मुसंडी मारण्याची संधी.

(धोका):- भाजपमधील इच्छुकांची मोठी संख्या बंडखोरीला आमंत्रण देऊ शकते, ज्याचा फायदा विरोधकांना होईल.

राजकीय वझीरचा ‘मास्टरस्ट्रोक’ :-

प्रभाग ३४ मध्ये यावेळी येथील जनता केवळ आश्वासनांवर भुलणार नाही. जो उमेदवार ‘पावसाळ्यातील पाणी’ आणि ‘अतिक्रमणाची समस्या’ सोडवण्यावर ठोस कृती आराखडा मांडेल, मानेवाड्याची जनता त्यालाच आपला नेता म्हणून निवडेल.